शेगाव: दर्शनासाठी आलेल्या ५८ वर्षीय महिलेची फसवणूक करून अज्ञात चोरट्याने सोन्याची पोत लंपास केल्याची घटना ८ मार्च रोजी दुपारी ४ वाजता घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सौ. सुनिता पुरुषोत्तम इंगळे (रा. राऊळ, ता. खामगाव) या श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन घरी परत जात होत्या. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ मोटारसायकलवर येऊन थांबला. त्याने महिलेला खामगावला सोडतो असे सांगून मोटारसायकलवर बसवले. मध्यरस्त्यात हॉटेल सर्वोत्तमजवळ थांबवून त्याने महिलेला नवीन सोन्याचा नेकलेस करून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर महिलेने स्वतःची ९ ग्रॅम वजनाची, ५२ मण्यांची सोन्याची पोत (किंमत अंदाजे ६० हजार रुपये) काढून त्याच्या हाती दिली. मात्र, चोरट्याने त्या सोन्याच्या बदल्यात नवीन नेकलेस आणून देतो असे सांगून पळ काढला. बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही तो परत न आल्याने महिलेला फसवणुकीची जाणीव झाली.
या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.