शेगाव – वजन काटा चुकीचा असल्याच्या आरोपावरून वाद उफाळल्याने एका धान्य विक्रेत्यास मारहाण केल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घडली. या प्रकरणी लखपती गल्ली, अग्रसेन चौक येथे राहणारे धान्य विक्रेते आकाश जेठाराम पालीवाल (वय २७) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी संकेत देशमुख, पंकज आणि विकी या तिघांनी पालीवाल यांच्या दुकानासमोर येऊन त्यांचा वजन काटा चुकीचा असल्याचा आरोप करत तो बदलण्याची मागणी केली. यावरून वाद वाढला आणि संकेत देशमुख याने लाकडी काठीने पालीवाल यांच्या डोक्यात प्रहार केला, ज्यामुळे त्यांना दुखापत झाली. तसेच, विकी याने त्यांच्या कॉलरला धरून खाली ढकलले, तर पंकज याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या गोंधळात फिर्यादीचे मामा वासुदेव पालीवाल यांनी हस्तक्षेप करत त्यांना आरोपींच्या तावडीतून सोडवले. घटनेनंतर घाबरलेल्या पालीवाल यांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.