शेगावः एका पतसंस्थेत काम करणाऱ्या ६५ वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना २ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता घडली. या प्रकरणी पीडित महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, आरोपी ओमप्रकाश सुरजमल शर्मा (रा. भैरव चौक, शेगाव) हा पतसंस्थेच्या कॅबिनमध्ये आला आणि संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती मागू लागला. मात्र, पीडित महिलेने संबंधित माहिती देण्यास नकार दिला. यानंतर आरोपीने अश्लील शिवीगाळ करत तिच्याशी अयोग्य वर्तन केले आणि अंगाला स्पर्श केला. या कृत्यामुळे महिला घाबरली आणि ओरडली.
घटनेच्या वेळी संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांनी आरोपीला कॅबिनमधून बाहेर काढले. मात्र, निघताना आरोपीने पीडितेला धमकी दिली की, “जर माझ्या विरोधात तक्रार केली, तर मी आत्महत्या करून तुम्हाला दोषी ठरवीन.”महिलेच्या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
पतसंस्थेत काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल! शेगाव येथील घटना
