मलकापूर:- नगर सेवा समितीद्वारे संचालित ली. भॊ. चांडक विद्यालयात दिनांक ३० नोव्हेंबर रोजी आजादी का अमृतमहोत्सव निमित्ताने तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. न्यायमूर्ती एस. ए. कुलकर्णी, ऍड. विशाल जी. इंगळे, व ऍड. उदय व्ही. कापले तसेच सौ.आर. जी कोल्हे हे उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रा. डॉ. जयंत राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होती .
कार्यक्रमात ऍड. विशाल जी. इंगळे यांनी शिक्षणाचा हक्क या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार असून त्याचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी कसा करता येईल यावर भर दिला. ऍड. उदय व्ही. कापले यांनी सायबर गुन्ह्यांबद्दल चर्चा केली. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व आणि सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजना समजावून सांगितल्या.
न्यायमूर्ती एस. ए. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील शिस्त आणि जागरूकतेचे महत्त्व विषद केले. त्यांनी आदर्श नागरिक होण्यासाठी कायद्याचे पालन, प्रामाणिकपणा आणि सामाजिक उत्तरदायित्वावर भर देत, शिस्तबद्ध जीवनाने समाजात सकारात्मक बदल कसा घडवता येईल हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद काळे यांनी केले, तर प्रा. डॉ. जयंत राजूरकर यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.