संग्रामपूर : दुचाकी चोरी करून ती गहाण टाकणाऱ्या टोळीचा तामगाव पोलिसांनी पर्दाफाश करत मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे. ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या या कारवाईत चोरीस गेलेली दुचाकीही पोलिसांनी हस्तगत केली आहे.
१९ जानेवारी रोजी रात्री वकाना येथील बद्रीनारायण महादेव ठोंबरे यांची एमएच-२८-बीटी-३५०९ क्रमांकाची दुचाकी घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. सकाळी दुचाकी न आढळल्याने ठोंबरे यांनी तामगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला गती देत संशयितांचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान ही दुचाकी अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे चोरी करून गहाण ठेवण्यात आल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी सापळा रचत इरशाद खान उर्फ फरदीन खान, शेख साजिद (दोघे रा. जळगाव जामोद) आणि शेख जाकीर उर्फ शेख जहबाज (रा. हिवरखेड, ता. तेल्हारा) यांना अटक केली. पोलिसांनी चोरीची दुचाकी जप्त केली असून तिन्ही आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात सक्रिय असलेल्या वाहनचोरीच्या टोळीबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
