मलकापूर:- दुबईतील मराठी समाजाचे एक विश्वासार्ह आणि अग्रगण्य व्यासपीठ असलेल्या महाराष्ट्र मंडळ दुबईच्या अध्यक्षपदी मलकापूर येथील अजय भांगे यांची १७ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत निवड करण्यात आली. मंडळ आपल्या स्थापनेचा ५३ वा वर्धापनदिन साजरा करत असताना नेतृत्वाची धुरा स्वीकारणे हा अभिमानाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. नव्या कार्यकारिणीत सचिवपदी राहुल कुलकर्णी तर कोषाध्यक्षपदी सौ. गौरी देवधर यांची निवड करण्यात आली असून, १३ सदस्यांची सशक्त कार्यकारिणी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामुदायिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणार आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ महाराष्ट्र मंडळ दुबईने गणेशोत्सव, नाट्यप्रयोग, सांस्कृतिक महोत्सव व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मराठी समाजाला एकत्र बांधण्याचे कार्य केले आहे. या परंपरेला पुढे नेत युवा पिढीला सहभागी करून घेणारे उपक्रम राबवण्याचा निर्धार नव्या नेतृत्वाने व्यक्त केला आहे. अध्यक्षपद स्वीकारताना अजय भांगे म्हणाले, “महाराष्ट्र मंडळ दुबई हे परदेशातील मराठी माणसासाठी सांस्कृतिक माहेरघर असून, सर्वांच्या सहकार्याने मंडळाचे कार्य अधिक व्यापक व प्रभावीपणे पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील.”