रोहिणखेड : हिंस्त्रप्राणी चित्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना काल दि ३० सप्टेंबर रोजी रोहिणखेड शिवारात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. बळीराम जगराम राठोड (वय ४०) असे जखमी इसमाचे नाव आहे. बळीराम राठोड हे रोहिणखेड येथून आपल्या दुचाकीने मित्रासोबत काल सोमवार ३० सप्टेंबर रोजी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास नाईकनगरकडे जात होते.दरम्यान, त्यांच्यावर रोहिणखेड शिवारातील संजय आमले यांच्या शेताजवळ अचानक पाठीमागून हिंस्त्रप्राणी चित्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात बळीराम राठोड हे जखमी झाल्याने त्यांच्यावर रोहिणखेड येथे उपचार करुन त्यांना रात्री ९ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे नेण्यात आले. वन्यप्राण्यांचे माणसावर हल्ले वाढल्याने शेतकरी भयभीत झाले आहे. अधिकाऱ्यांनी वनविभागाच्या वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.