कारच्या धडकेत ऑटो उलटून; दुचाकी चिरडली, सुदैवाने जीवितहानी टळली

खामगाव : शहरातील टिळक पुतळा परिसरात सायंकाळच्या गर्दीच्या वेळी झालेल्या भीषण अपघातात भरधाव कारने ऑटोला जोरदार धडक दिल्याने ऑटो उलटून जवळून जाणारी दुचाकी ऑटोखाली चिरडली गेल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या घटनेने काही काळ परिसरात खळबळ उडाली. मंगळवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या संतोष मधुकर काकड (रा. गोंधनापूर) याने कारवरील नियंत्रण गमावल्याने समोरून येणाऱ्या गजानन देशमुख यांच्या ऑटोला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की ऑटो जागीच उलटला. त्याचवेळी जवळून जात असलेली एक दुचाकी ऑटोखाली दबली गेली. अपघात होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. काही नागरिकांनी जखमींना बाहेर काढण्यास मदत केली, तर काहींनी वाहतूक नियंत्रणासाठी पुढाकार घेतला. या अपघातामुळे टिळक पुतळा परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि काही वेळात वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दरम्यान, ऑटो चालक गजानन देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून कार चालक संतोष मधुकर काकड याच्याविरुद्ध कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), ३२४ (४) बीएनएस तसेच कलम १८४, १८५ मोवाका व ९९/१७७ मपोका अन्वये खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!