मलकापूर ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ): शहरातील भारत कला रोडवरील हकिमी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या एका वृद्ध महिलेचा मृतदेह तब्बल सहा तास अडवून ठेवण्यात आल्याची घटना घडली. हॉस्पिटल प्रशासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया झाल्यानंतरही ४० हजार रुपयांची मागणी करत मृतदेह नातेवाईकांना दिला नाही. या प्रकारामुळे नातेवाईकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख गजानन ठोसर आणि नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रशासनाला जाब विचारत तोडफोडीचा इशारा दिला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
ग्राम शिराढोण येथील कमलबाई यादव इंगळे (वय ६८) या महिलेचा ५ एप्रिल रोजी अपघात होऊन हात व पाय फ्रॅक्चर झाले. त्यांना हकिमी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. महात्मा फुले योजनेअंतर्गत ७ एप्रिल रोजी रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. मात्र ९ एप्रिल रोजी पहाटे त्यांचे हॉस्पिटलमध्येच निधन झाले.
मृत्यू झाल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने नातेवाईकांना सांगितले की, योजनेचे ॲप्रुव्हल आलेले नसल्याने ४० हजार रुपये भरावे लागतील. पैसे भरल्याशिवाय मृतदेह दिला जाणार नाही, असे सांगण्यात आले. यामुळे नातेवाईक हवालदिल झाले. त्यांनी शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर व नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ यांना माहिती दिली. दोघांनीही हॉस्पिटलमध्ये येऊन प्रशासकांना जाब विचारत तोडफोडीचा इशारा दिला. अखेर हॉस्पिटल नरमले आणि मृतदेह मुलगा योगेश इंगळे व इतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
यावेळी ॲड. हरीश रावळ म्हणाले, “महात्मा फुले योजनेचा उद्देश गरिबांना मोफत आरोग्य सेवा देण्याचा आहे. मात्र काही हॉस्पिटल केवळ पैशांच्या लालसेपोटी अशा अमानवी कृती करतात. अशांविरोधात तक्रार करा, आम्ही कारवाई करू.”