मुक्ताईनगर( दिपक इटनारे ):- विवेकानंद विद्यालय नरवेल येथील 1987-88 च्या दहावीच्या बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा नुकताच पद्मश्री मंगल कार्यालय, मुक्ताईनगर येथे आनंदोत्सवाच्या वातावरणात पार पडला. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध डॉक्टर मा. जगदीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दीप प्रज्वलन व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भुसावळचे माजी सभापती किरण कोलते, किशोर कोलते, येवले, मोरे सर उपस्थित होते. प्रास्ताविक भाषण डिझायर कोचिंग क्लासेस, खामगावचे संस्थापक अध्यक्ष दामोदर दांडगे यांनी केले. त्यात त्यांनी शालेय जीवनातील गम्मती, संघर्ष आणि शिक्षणाच्या मार्गातील प्रेरणादायी अनुभव मांडले. पोलीस विभागात कार्यरत रामचंद्र भोपळे यांनी विनोदी शैलीत शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला, तर मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक अरुण राणे यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून उपस्थितांना मनमोहक मनोरंजन प्रदान केले. पाटबंधारे विभागातील इंजिनियर नीलकंठ कांडेलकर यांनी ‘एकदा परत भेटू’ ही स्वरचित कविता सादर केली. कार्यक्रमात पुणे येथून आलेले संजय किनगे, जगन्नाथ उन्हाळे, बबीता ताई, तसेच प्रवचनकार ह. भ. प. मालतीताई झांबरे आणि रजनीताई नाफडे यांनी आपापली मनोगते मांडली. भुसावळचे प्रसिद्ध गायक येवले साहेब यांनी सुरेल गाणी गायली, तर आनंदा कोळी यांनी नृत्य आणि कविता सादर करून कार्यक्रमात उत्साहाचा रंग भरला. कार्यक्रमाच्या शेवटी माजी विद्यार्थ्यांनी “एक दिवस मित्रांसाठी” या गोड आठवणींना उजाळा दिला, बकेटमध्ये बॉल टाकणे आणि संगीत खुर्ची खेळून शालेय जीवनातील मजेदार क्षण पुन्हा अनुभवले. यावेळी सर्वांना ‘मैत्री सन्मान चिन्ह’ देण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर मा. जगदीश पाटील यांनी आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व सांगितले आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांना चालना देत पुढे जाण्याचा संदेश दिला. या भव्य समारंभाला अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीने मान दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार निवृत्ती इंगळे सर यांनी केले, तसेच ग्रुप डान्स व स्नेहभजनाने समारंभाची सांगता झाली. संपूर्ण मेळावा अत्यंत यशस्वी ठरला, आणि सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या सोबत गोड आठवणी ताज्या केल्या.
विवेकानंद विद्यालय नरवेल येथील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न
