देऊळगाव राजा :- छत्रपती शासन गणेश मंडळाच्या पेंडॉलवरील ताडपत्री (मंडप) काढत असताना वरून गेलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. पप्पू लाड असे मृत युवकाचे नाव आहे. शहरातील कोंडवाडा चौकात छत्रपती शासन गणेश मंडळाची यावर्षी प्रथमच स्थापना करण्यात आली होती. श्री गणपती विसर्जनानंतर टिनपत्रे व ताडपत्री काढण्यासाठी मोतीलाल उर्फ पप्पू विष्णू लाड (वय ३४) हा युवक वर चढला. दरम्यान पेंडॉलवरून जात असलेल्या विद्युत वाहिन्यांना स्पर्श होऊन तो खाली कोसळला. या घटनेन गावातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. तर मंडळातील सदस्यांनी तात्काळ पप्पू यास डॉ. शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून सदर युवकास मृत घोषित केले. श्री गणेशोत्सव विसर्जन शांतेत पार पडल्यानंतर विद्युत तारेचा शॉक लागून गणेश भक्ताचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.