मलकापूर : नातेसंबंधालाच काळिमा फासणारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना मलकापूर शहरात समोर आली आहे. खोटे व बनावट दस्त तयार करून, आजीच्या माघारी तिच्या नावाचा बनावट अंगठा व सही वापरून प्रतिज्ञापत्र तयार करत जमीन स्वतःच्या नावावर करून ती परस्पर विकून टाकल्याचा आरोप करत एका आजीने स्वतःच्या नातवाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत पद्मिणी दयाराम गवई (रा. मलकापूर) यांनी उपविभागीय अधिकारी, मलकापूर यांच्याकडे २ फेब्रुवारी रोजी सविस्तर निवेदन सादर केले आहे. दिलेल्या निवेदनात पद्मिणी गवई यांनी नमूद केले आहे की, त्यांच्या मालकीची व प्रत्यक्ष ताब्यातील मिळकत क्रमांक ८४५ असून या मालमत्तेचा कर भरण्यासाठी त्या मलकापूर नगर परिषद कार्यालयात गेल्या असता, सदर मालमत्ता त्यांच्या नातू सचिन गौतम ओव्हाळ याच्या नावावर नोंद करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही नोंद खोटे व बनावट दस्त तयार करून तसेच तत्कालीन संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत करून करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी सचिन ओव्हाळ याने १०० रुपयांच्या मुद्रांकावर पद्मिणी गवई यांच्या नावाचा खोटा व बनावट अंगठा व सही करून प्रतिज्ञापत्र तयार करून घेतले. मात्र, असे कोणतेही प्रतिज्ञापत्र आपण आजपर्यंत कोणालाही दिले नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे सदर जागा स्वतःच्या नावावर करून ती परस्पर विकून टाकल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारात नातव्यासह तत्कालीन संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असून त्यांनी संगनमताने खोटे व बनावट दस्त तयार करून आपली फसवणूक केल्याचे पद्मिणी गवई यांनी म्हटले आहे. भविष्यात अशा प्रकारे कोणत्याही नागरिकाची, विशेषतः ज्येष्ठ व्यक्तींची फसवणूक होऊ नये, यासाठी संबंधितांवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील लागू तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. निवेदनाच्या शेवटी पद्मिणी गवई यांनी आपल्या वयाचा व परिस्थितीचा उल्लेख करत, प्रशासनाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली असून, अन्यथा नाईलाजाने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही दिला आहे. या प्रकरणामुळे मलकापूर शहरात खळबळ उडाली असून प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.