मलकापूर जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील झाडे तोड प्रकरण; चौकशीची मागणी, प्रहारचा आंदोलनाचा इशारा

मलकापूर : शहरातील पाणी पुरवठा विभागाच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील हिरवीगार मोठी झाडे कोणतीही परवानगी न घेता कापण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतरही दोन दिवस उलटून न.प. प्रशासनाकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याने संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अजय टप यांनी दिला आहे.

यासंदर्भात अजय टप यांनी १० मार्च रोजी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मलकापूर नगर परिषद अंतर्गत असलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरात ८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास मोठी हिरवीगार झाडे कटर मशिनच्या सहाय्याने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तोडण्यात आली. या घटनेचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. शासनाकडून झाडे लावणे व झाडे जगविण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. नगर परिषदेमार्फतही ‘झाडे लावा, झाडे जगवा’ मोहीम राबवून लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र त्याच नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या परिसरातील मोठी झाडे तोडण्यात आली असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने हा प्रकार संबंधितांना पाठीशी घालण्याचा असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात झाडे तोडण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शेजारील शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र जर मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरून झाडे तोडण्यात आली असतील तर थेट तक्रार दाखल करणे अपेक्षित असताना केवळ नोटीस देऊन प्रशासन पळवाट काढत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणात झाडे नेमकी कोणाच्या आदेशावरून व कोणत्या कारणासाठी तोडण्यात आली याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अजय टप यांनी केली आहे. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून नगर परिषद प्रशासनाविरोधात तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!