उदयनगर : उदयनगर – हरणी मार्गावरील बेलासरी शिवारात रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत एका अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (३० मार्च) रात्री ही घटना घडली असून मंगळवारी सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, उदयनगरपासून काही अंतरावर ज्ञानगंगा अभयारण्याचा परिसर असल्यामुळे येथे बिबट्या, अस्वल यांसारख्या वन्यप्राण्यांची वर्दळ नेहमीच पाहायला मिळते. हरणी, वैरागड, उदयनगर तसेच किन्ही सवडत परिसरात शेतात काम करताना शेतकऱ्यांना अनेकदा या प्राण्यांचे दर्शन होते. गेल्या काही वर्षांत या भागात अस्वल व बिबट्यांची संख्या वाढल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. अशातच रविवारी रात्री रस्ता ओलांडत असताना एका अस्वलाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या धडकेत अस्वलाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी काही नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागाला कळविले. माहिती मिळताच वनविभागाचे आरएफओ वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उदयनगर वनपरिक्षेत्रातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनपाल नेवरे, आर.डी. पैठणे तसेच रेस्क्यू टीमचे संदीप मडावी यांच्यासह वनरक्षक व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. यानंतर मृत अस्वलाला शासकीय वाहनाद्वारे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.