फर्निचर दुकान फोडून ९७ हजारांचा माल लंपास

मेहकर : शहरालगतच्या चिखली रोडवरील चायगाव फाट्याजवळील मेहकर भाग-२ परिसरात अज्ञात चोरट्यांनी फर्निचर दुकानाचे शटर तोडून सुमारे ९७ हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढविण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
याप्रकरणी कैलास प्रकाश गाडे (वय ३६, रा. कल्याणा ता. मेहकर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या चायगाव फाट्याजवळील शेतजमिनीवर ‘श्रेया फर्निचर’ नावाचे दुकान असून येथे सागवान लाकडापासून विविध फर्निचर तयार करून विक्री केली जाते. २९ मार्च रोजी सायंकाळी दुकान बंद करून कर्मचारी घरी गेले होते. मात्र ३० मार्च रोजी सकाळी गाडे दुकानात आले असता मागील बाजूचे शटर उघडे दिसले. आत पाहणी केली असता चोरट्यांनी कडी-कोंडा तोडून प्रवेश करत २ एचपीच्या चार इलेक्ट्रिक मोटारी, सागवान लाकडाचे दरवाजे, टी-टेबल, मंदिरे, पलंग तसेच सीसीटीव्हीचा डीव्हीआर बॉक्स असा एकूण ९७ हजार रुपयांचा माल लंपास केल्याचे आढळले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर बॉक्सही चोरून नेल्याने तपासात अडचणी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!