मलकापूर : आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी योग्य दिशादर्शनाची आवश्यकता आहे. याच उद्देशाने नूतन इंग्लिश स्कूलमध्ये दि. ४ डिसेंबर, गुरुवारी संरक्षण खात्यात दीर्घ सेवा केलेले ब्रिगेडियर श्रीकांत मुकुंद हरिदास यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, क्रीडा कौशल्य आणि शैक्षणिक प्रगती याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास स्व. डॉ. वि. भी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे उपस्थित होते. त्यांच्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना तिन्ही संरक्षण दलांची मूलभूत माहिती, त्यातील संधी आणि राष्ट्रसेवेसाठी आवश्यक मानसिक-शारीरिक तयारी याविषयी मार्गदर्शन मिळाले. क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल कु. कृष्णा राजेश पाटील आणि अंकुश विकास भगत यांचा उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. दोघांनाही भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रदीप प्रकाश कोलते यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य एस. एस. खर्चे, उपप्राचार्य अमोल चोपडे, शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.