नांदुरा :- दारूच्या आहारी गेलेल्या माणसाचे व्यसन सुटत नाही असे म्हणतात, दारूचे व्यसन फार मोठ्या प्रमाणात लोकांना लागलेलं आहे, दारुमुळे अनेक घटना घडलेल्या आपणास पाहायला ऐकायला मिळतात अशीच एक धक्कादायक घटना नांदुरा तालुक्यातील वडनेर नजीक घडली आहे.या घटनेत नितीन विधाते (रा. बाळापुर फैल खामगाव) यांचा मृत्यू झाला.याबाबत ट्रक चालक गजानन बबन वसु यांनी नांदुरा पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, नितीन शिवाजी विधाते (४० वर्ष) हा वसू यांच्याकडे ट्रक क्लीनरचे काम करतो. मात्र तो दारू पिण्याच्या सवयीचा असून, त्याला फिट येतात. दरम्यान ट्रकचालक वसु आणि नितीन विधाते हे दोघे ट्रकने गुजरातवरून खामगावकडे येत होते. नितीन विधाते याला अचानक फिट आली. त्यामुळे त्याचे हात बांधून ठेवले होते. यानंतर, वडनेर भोलजी गावानजीक नितीन हा ट्रक मधून उतरला आणि नदी दिशेने पळत सुटला. पळताना तो अचानक खाली कोसळला आणि त्याच्या कमरेला लागलेली दारूची शिशी फुटली. दारूच्या शिशीचे काच फुटल्याने कमरेत व पोटात त्या काचा शिरल्या नितीनच्या पोटातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने सदर इसमाचा मृत्यू झाला.