Headlines

पोलीस दलातील शांत, नम्र चेहरा हरपला; हेड कॉन्स्टेबल पंजाबराव शेळके यांच्या मृत्यूने खळबळ..

बुलढाणा :- जिल्हा पोलीस दलाला हादरवून टाकणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. बुलढाणा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल पंजाबराव शेळके यांनी मेहकर तालुक्यातील बाबुलखेड येथील शेतातील विहिरीत उडी घेतल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे पोलीस दलासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबराव शेळके हे सध्या बुलढाणा पोलीस मुख्यालयात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. रविवारी बाबुलखेड परिसरातील एका शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. ही बाब समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पुढील तपासासाठी व शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, पंजाबराव शेळके यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपासानंतरच याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. शेळके यांनी यापूर्वी मलकापूर शहर पोलीस ठाण्यातही सेवा बजावली होती. मनमिळाऊ स्वभाव, नम्र बोलणे आणि सहकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे ते पोलीस दलात ओळखले जात होते. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने पोलीस दलात आणि त्यांना ओळखणाऱ्या सर्वांमध्ये शोककळा पसरली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!