मोताळा : – अमली पदार्थांविरोधातील कारवाईत बोराखेडी पोलिसांनी मोठी कारवाई करत जवळपास दोन लाख रुपयांचा गांजा जप्त केला असून एका २१ वर्षीय युवकाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी ५ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ४ वाजता करण्यात आली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोराखेडी पोलिसांना स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती (कृउबा) परिसरातील कॉटन मार्केट भागात अजय रोहिदास मोहिते (वय २१) हा गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली. धाडीदरम्यान पोलिसांनी अजय मोहिते याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून १ लाख ९६ हजार रुपये किमतीचा ९ किलो ८०० ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले व मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पीएसआय राजेंद्र कपले यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिस स्टेशनमध्ये आरोपी अजय मोहिते याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक १८६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २० (ब) (II) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास एपीआय बालाजी शेंगेपल्लू व हेडकॉन्स्टेबल दिलीप तडवी करीत आहेत.