मलकापूर:-
मलकापूर ग्रामीण पोलिस स्टेशन आणि धानोरा (विटाळी) येथील ग्रामस्थांनी परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एकत्रित येत नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.यासंबंधी शनिवारी सायंकाळी धानोरा येथे पोलिस निरीक्षक सतीश महल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस विभाग आणि ग्रामस्थांमध्ये एक महत्वाची नियोजन बैठक देखील पार पडली.
मागील काही महिन्यांपासून धानोरा,विटाळी, काटी, सीरसोडी तसेच माकनेर या भागामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. याबाबत पंचायत समितीच्या माजी उपसभापती योगिता गावंडे यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना या भागात रात्रीची ग्रस्त वाढविण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली होती. अशा वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी केवळ पोलीस प्रशासनावरच अवलंबून राहून चालणार नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेता पंचायत समितीच्या माजी उपसभापती योगिता गावंडे तथा पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप गावंडे यांच्या पुढाकारातून पोलिस आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नियोजनात्मक कार्यपद्धती आखण्याच्या दृष्टीने मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश महल्ले यांच्या प्रमुख मार्गदर्शनात शनिवारी सायंकाळी धानोरा येथे महत्त्वाची नियोजन बैठक पार पडली.
सदर बैठकीला पोलीस विभागाकडून पोलीस निरीक्षक सतीश महल्ले, पोहेका सचिन दासर, पोका संदीप राखोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर पंचायत समितीच्या माजी उपसभापती योगिता गावंडे, पोलीस पाटील वीरेंद्र नरवाडे यांचे सह गावातील मोठ्या संख्येने महिला, पुरुष तसेच विशेष करून तरुण वर्गाची सदर बैठकीला उपस्थिती होती.
वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी अवलंबण्याच्या उपाययोजना सुचवितांना पोलीस निरीक्षक सतीश महल्ले यांनी ग्रामस्थांना आपल्या मौल्यवान दागिने तसेच रोख रकमेची सुरक्षा करण्याच्या दृष्टीने उपयुक्त माहिती दिली. सध्याच्या काळात चोरटे अवलंबित असलेली कार्यपद्धती समजावून सांगत त्यावर आपण कशाप्रकारे मात करू शकतो आणि आपल्या मौल्यवान दागिन्यांची तसेच रोख रकमेची कशी सुरक्षा करू शकतो याबाबत महत्त्वाच्या टिप्सही दिल्या. ग्रामस्थांना आश्वस्त करत रात्री बेरात्री केव्हाही कोणी संशयित आढळून आल्यास सरळ ग्रामीण पोलीस स्टेशनला फोन करून कळविल्यास ग्रामस्थांच्या हाकेला ग्रामीण पोलिसांच्या वतीने तात्काळ साद देण्यात येईल अशी ग्वाही देखील पोलिस निरीक्षक महल्ले यांनी दिली. त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये तसेच शांतता व सुव्यवस्था राखावी, कोणीही संशयित आढळून आल्यास त्याला स्वतः दंड न करता तात्काळ पोलिसांना कळवावे अशी महत्त्वाची सूचना देखील त्यांनी केली. पोलीस विभाग 24 तास जनतेच्या सेवेसाठीच असल्याचे सांगतानाच लोकसंख्येच्या मानाने अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कशा मर्यादा पडतात याची देखील पोलीस निरीक्षक महल्ले यांनी जाणीव करून दिली.
सचिन दासर यांनी ग्रामस्थांची संवाद साधताना सध्याच्या काळात चोऱ्या ह्या केवळ घर फोडून किंवा मौल्यवान ऐवज चोरल्यानेच होत नसतात तर आपल्या बँक खात्यातून ऑनलाईन पद्धतीने पैसे चोरण्यात येतात, मोबाईलच्या माध्यमातून खात्यातील पैसे चोरण्यात येतात याकरिता चोरांना प्रत्यक्ष आपल्या घरी किंवा गावात येण्याची गरजही पडत नाही, याबाबत ग्रामस्थांचे लक्ष वेधत अशा सायबर चोरांपासून आपल्या संपत्तीचे पैशाचे कसे रक्षण करावे याबाबत ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन केले.
संदीप राखोंडे यांनी ग्रामस्थांशी साधलेल्या आपल्या संवादा दरम्यान ग्राम सुरक्षा दलाचे महत्त्व पटवून दिले. ग्रामीण भागात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गावातील तरुणांनी जर आळी पाळीने रात्रीच्या वेळी एक ते चार वाजे दरम्यान गावामध्ये गस्त घातली तर नक्कीच चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले. त्याकरिता ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून सदर ग्राम सुरक्षा दल सदस्यांना पोलीस स्टेशनच्या वतीने ओळखपत्र, शिटी तसेच इतर आवश्यक साहित्य पुरविण्यात येईल आणि पोलीस आणि ग्राम सुरक्षा दलाचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्या माध्यमातून ग्राम सुरक्षा दलातील सदस्य आणि पोलीस विभाग यांच्यामध्ये समन्वय साधता येईल आणि गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला.
ग्रामीण भागातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी धानोरा येथे पार पडलेल्या या नियोजनात्मक बैठकीमुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यातील सुसंवाद वाढीस लागल्यास समाजात नक्कीच एक आशादायक वातावरण निर्माण होऊ शकते हे या बैठकीच्या माध्यमातून अधोरेखित झाले आहे.
चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस आणि ग्रामस्थांचे एकत्रित नियोजन..
