Headlines

ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ; पोलिस गस्त वाढविण्याची सौ. योगिता गावंडे यांची मागणी!

 

मलकापूर :- ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा, विटाळी, काटी, माकनेर आदी गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस चोरट्यांचा वावर वाढल्यामुळे ग्रामस्थ अस्वस्थ झाले असून पोलिस प्रशासनाने तातडीने रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी पंचायत समिती उपसभापती तथा महिला दक्षता समिती सदस्य सौ. योगिता संदीप गावंडे यांनी पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,धानोरा येथील एका नागरिकाच्या घरी काही महिन्यांपूर्वी दागिने व रोकड चोरीस गेल्याची घटना घडली होती. तसेच काटी गावातही काही दिवसांपूर्वी घरफोडी करून दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा चोरट्यांचा संशयास्पद वावर दिसून येत असून, रात्रीच्या वेळी गावातील नागरिकांनी जागून पहारा देण्यास सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी तसेच चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी आणि परिसरात भयमुक्त वातावरण निर्माण करावे, अशी मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!