मलकापूर:- शहरातील एका प्रख्यात डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने आपल्या मुलाचा पाय कायमचा जायबंदी झाल्याचा आरोप करत या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी मलकापूर शहरातील एका महिलेने केली होती. मात्र एक महिना होऊनही पोलिसांनी कुठलीही कारवाई या डॉक्टर विरोधात केली नसल्याने आणि गुन्हाही नोंदवला नसल्याने या पीडित महिलेने चक्क पोलीस निरीक्षकांच्या दालनात जाऊन त्यांची आरती केली. काल रात्री संबंधित महिलेने पोलीस स्टेशन गाठत हातात आरतीचे ताट घेऊन थेट ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या दालनात शिरल्या.
मी दिलेल्या तक्रारीची अद्याप दखल न घेता कुठलीही कारवाई केली नसल्याचे जाब विचारत त्यांनी ठाणेदाराची चक्क आरतीच उतरवली. यामुळे ठाणेदारांनी पुढील दोन दिवसात यावर ठोस कारवाई करतो, असे उत्तर देऊन आक्रमक महिलेला शांत केले. मात्र या महिलेने उचललेल्या पावलाची जिल्हाभरात चांगलीच चर्चा होत आहे.