मलकापूर : शहरातील अब्दुल हमीद चौक परिसरात किरकोळ कारणावरून दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होऊन दगडफेक झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या घटनेचे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना अप्पर पोलीस अधीक्षक श्रोनिक लोढा यांनी घटनास्थळावरून हटविल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, लहान मुलांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. हा वाद वाढत जाऊन काही ठिकाणी दगडफेक झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या घटनेनंतर दोन्ही समाजातील नागरिक मोठ्या संख्येने अब्दुल हमीद चौक परिसरात जमा झाले होते. त्यामुळे काही काळ परिस्थिती तणावपूर्ण बनली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान, या घटनेचे वृत्तसंकलन करण्यासाठी स्थानिक पत्रकार घटनास्थळी पोहोचले असता अप्पर पोलीस अधीक्षक श्रोणिक लोढा यांनी पत्रकारांवर अरेरावी करत त्यांना तेथून हटविल्याचा अज्ञानी पणा श्रोनिक लोढा यांनी केला आहे. पत्रकार हे गर्दीचा भाग नसून त्यांना घटनास्थळी वृत्तसंकलन करण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयीन निर्णयांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांना जबरदस्तीने हटविणे म्हणजे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली असल्याची भावना पत्रकारांमध्ये व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, ही घटना अब्दुल हमीद चौक परिसरात असलेल्या दंगा काबू पथक पोलीस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर घडली. त्यामुळे इतक्या संवेदनशील ठिकाणी तणाव निर्माण होऊन दगडफेक होईपर्यंत पोलीस यंत्रणा काय करत होती, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. घटनेचे वास्तव म्हणजेच बुडा खालील अंधार प्रकाशात येऊ नये म्हणून पत्रकारांना श्रोनिक लोढा यांनी घटनास्थळावरून हटविण्यात आले. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात पत्रकारांना रोखण्याची भूमिका आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे अज्ञानी पणाचे सोंग यामुळे पत्रकार संघटनांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.