मलकापूर :- चैतन्यवाडी परिसरात दुपारच्या सुमारास घरफोडीची घटना घडून शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत चोरट्यांनी घरातील कपाट फोडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाइल असा एकूण ₹6,55,683 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद मलकापूर शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
फिर्यादी रविकुमार शिवाजी राठोड (वय 32 वर्षे, रा. चैतन्यवाडी, मलकापूर, मूळ रहिवासी गांधारी, ता. लोणार, जि. बुलढाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 10 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारास त्यांच्या पत्नी शेजारी राहणारे रुपेश पाटील यांच्या घरी गेल्या होत्या. सुमारे पंधरा मिनिटांनी परत आल्यावर त्यांनी पाहिले असता घराचा दरवाजा उघडा होता. घरात प्रवेश केल्यानंतर कपाट उघडे आणि आतमधील लॉकर तोडलेले असल्याचे आढळले. कपाटातील लॉकरमधून सोन्याची चैन (13 ग्रॅम), तीन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचा गोप, सोन्याचे गहुनणी, सोन्याचे ब्रेसलेट, रोख ₹1,75,000 तसेच रिअलमी GT-2 मोबाईल असा एकूण ₹6,55,683 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या प्रकरणी कलम 331(1), 305(क) भा.दं.सं. अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दाखल अधिकारी पोलीस हवालदार सचिन पाटील तर तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कौळसे यांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चोरट्यांचा शोध सुरू केला असून, शहरात सलग, खून, दरोडे, लाचेची मागणी, अपहरण, चोरी घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.