मलकापूर :- शहरातील बन्सीलाल नगर परिसरात झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी वेगवान कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या तिघांची ओळख सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पटवण्यात आली असून त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे. ही घटना 6 मार्चच्या मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. चोरट्यांनी एका रात्रीत चार ते पाच घरे फोडून रोकड आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या. विशेषतः, एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्याला चाकू लावून तिचे दागिने लुटण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तीन संशयित आढळले. त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास सुरू आहे.