मलकापूर – शहरातील अबला पेट्रोल पंपाजवळ चाकूचा धाक दाखवून एका युवकाची ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून, दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.
पुरुषोत्तम विष्णू कुटे (२२, रा. पोटा, ता. नांदुरा) हा युवक दुचाकी (एमएच २८ बीपी ८०६८) घेऊन अबला पेट्रोल पंपाजवळ उभा असताना, दोन जणांनी त्याच्यावर चाकूचा धाक दाखवत गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. त्यानंतर त्याला मारहाण करत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर वरगे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तपासाची चक्रे फिरवली. एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, दुसरा आरोपी अरविंद ऊर्फ गबऱ्या सोळंके फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पुरुषोत्तम कुटे यांच्या फिर्यादीवरून अरविंद ऊर्फ गबऱ्या सोळंके आणि एका अल्पवयीन मुलाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे रेल्वे स्टेशन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.