मलकापूर :- रेल्वे रुळ ओलांडताना इंजिनची धडक बसून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 12) सकाळी मलकापूर रेल्वे स्थानकाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे 6.20 वाजताच्या सुमारास मलकापूर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकवर एका महिलेचा अपघात झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली. माहिती मिळताच रेल्वे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान मृत महिलेची ओळख सुनीता रवी महाले (वय 38) अशी पटली. त्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मूळ रहिवासी असून सध्या बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. मृत महिलेचा मुलगा आदित्य रवी महाले (वय 17) याने दिलेल्या माहितीनुसार, ते आईसोबत रेल्वेने प्रवासासाठी जात होते. दरम्यान रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना अचानक समोर आलेल्या इंजिनमुळे गोंधळ उडाला आणि सुनीता महाले यांना इंजिनची धडक बसली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जीआरपी व आरपीएफचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी व शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.
