मलकापूर : – शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्सचे संचालक अॅड. अमरकुमार संचेती यांच्यावर मलकापूर रेल्वे स्थानकात धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना सोमवारी (दि. 9 ) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. जखमी संचेती यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. संचेती हे आपल्या मुलीला अमरावती–सुरत रेल्वेत बसविण्यासाठी दुपारी सुमारे 12.30 वाजता मलकापूर रेल्वे स्थानकात आले होते. ते फलाट क्रमांक 1 वर गाडीची प्रतीक्षा करत उभे असताना एका तरुणाच्या संशयास्पद हालचाली त्यांच्या निदर्शनास आल्या. संबंधित तरुण महिलांशी, विशेषतः तरुणींशी अयोग्य वर्तन करत असल्याचे पाहून संचेती यांनी त्याला समज देत तेथून दूर जाण्यास सांगितले. यानंतर काही वेळाने रेल्वे स्थानकात गाडी दाखल होत असताना त्या तरुणाने संधी साधत संचेती यांच्या उजव्या खांद्यावर धारदार शस्त्राने वार केला. जखमी अवस्थेतही संचेती यांनी हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शर्टमधून रक्तस्राव होत असल्याचे पाहून उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले. दरम्यान, संतप्त नागरिकांनी हल्लेखोराला पकडून त्याला मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. सुरेश मोहन राजगुरे (रा. कल्याण, मुंबई) असे हल्लेखोराचे नाव असून मारहाणीमुळे तोही जखमी झाला आहे. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात अॅड. संचेती यांच्या उजव्या खांद्यावर गंभीर जखम झाली असून त्यावर सुमारे 14 टाके घालावे लागल्याची माहिती मिळाली आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे शेगाव प्रभारी विवेकानंद राळेभात यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. हल्लेखोराने धारदार कटरचा वापर केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या घटनेमुळे मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.