मलकापूर :- दुकान भाड्याने दिल्याच्या कारणावरून २७ वर्षीय विवाहित महिलेला केस ओढून मारहाण केल्याची घटना दाताळा (ता. मलकापूर) येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी राहुल देशमुख (वय २७) या २७ फेब्रुवारी रोजी दुपारी आपल्या घरी असताना आरोपींनी त्यांच्याकडे जाब विचारत वाद सुरू केला. “दुकान भाड्याने का दिले?” या कारणावरून वाद वाढला आणि तो थेट मारहाणीपर्यंत पोहोचला. आरोपी राहुल मुरलीधर देशमुख (रा. दाताळा) व वैशाली वीरेंद्र खर्चे (रा. मलकापूर) यांनी लक्ष्मी देशमुख यांचे केस धरून त्यांना चापटा-बुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर पीडित महिलेनं मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चा रंगली असून किरकोळ कारणावरून वाढणाऱ्या वादांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
