मलकापूर :- चारित्र्यावर संशय घेत मारहाण करणे तसेच फ्लॅट खरेदीसाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संध्या संजय वरमोरा (वय २७) या सध्या मलकापूर येथील आठवडी बाजार परिसरात वास्तव्यास असून मूळच्या सागनवा, ता. लोधीका, जि. राजकोट (गुजरात) येथील आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, पती संजय मनसुफभाइ वरमोरा यांच्यासह कुटुंबीयांनी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार मारहाण केली. तसेच फ्लॅट घेण्यासाठी माहेरवरून एक लाख रुपये आणण्याचा दबाव टाकण्यात येत होता. पैसे न आणल्यास तुला नीट वागविणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सासू-सासरे, दिर व जाऊ यांनी पतीला भडकावून शिवीगाळ व मारहाण करण्यास प्रवृत्त केल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे. यामुळे शारीरिक तसेच मानसिक छळ सहन करावा लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीवरून पतीसह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय निबोळकर करीत आहेत.
