ढोल-ताशांच्या गजरात दुमदुमली नगरी; “जय भवानी, जय शिवराय”च्या घोषणांनी भारावले मलकापूर

 

मलकापूर ( दिपक इटणारे ) : ढोल, ताशे आणि तुतारींच्या निनादात आसमंत दुमदुमला… पोवाड्यांतून उलगडणारी हिंदवी स्वराज्याची तेजस्वी गाथा… भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेली तरुणाई… आणि “जय भवानी, जय शिवराय”च्या गगनभेदी घोषणांनी थरारलेली नगरी! अशा ओसंडून वाहणाऱ्या उत्साहपूर्ण वातावरणात विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूर येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव दिमाखात साजरा करण्यात आला.
शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी नगर येथील मंदिरात भवानी मातेचे पूजन व शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. “जय भवानी, जय शिवराय”च्या जयघोषात संपूर्ण परिसर भारावून गेला. यावेळी आमदार चैनसुख संचेती, उत्सव समितीचे अध्यक्ष शिवराज भैया जाधव यांच्यासह शहरातील गणमान्य व्यक्ती, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी १० वाजता गोविंद विष्णू महाजन विद्यालय येथून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. दुपारी ४ वाजता हनुमान चौक येथून निघालेल्या शोभायात्रेने शहराच्या मुख्य मार्गांवरून दिमाखदार फेरी मारली. शोभायात्रेत विविध मंडळांचे आकर्षक चित्ररथ सहभागी झाले होते. शिवचरित्रातील ऐतिहासिक प्रसंग जिवंत स्वरूपात साकारले गेले. अशा प्रसंगांनी उपस्थितांचे डोळे पाणावले आणि हृदय अभिमानाने भरून आले. तरुणाईने पारंपरिक खेळांचे सादरीकरण करत सांघिक शौर्याचे दर्शन घडविले. लेझीम, लाठी-काठी, पावली आदी प्रकारांतून शिस्तबद्ध तालबद्ध सादरीकरण झाले. कोल्हापूर येथील तलवारबाजी पथक, पुणे येथील एलईडी शो, खामगावचे रोप मल्लखांब पथक, शेगावचे दिंडी पथक तसेच फायर शो यांनी शोभायात्रेची रंगत अधिकच वाढविली.
यामध्ये लेझीम पथक स्पर्धेत माता महाकाली लेझीम पथकाने प्रथम क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधले. द्वितीय क्रमांक दुर्गा नगर पथकाने, तर तृतीय क्रमांक यशवंत लेझीम मंडळाने मिळविला.
देखावा स्पर्धेत छत्रपती शिवाजीनगर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक जाधव वाडी, तर तृतीय क्रमांक संत ज्ञानेश्वर नगर व रामवाडी यांना देण्यात आला. विजेत्या मंडळांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले. मलकापूर शहरात अनेक वर्षांपासून शिवजयंती सर्वसमावेशक, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण पद्धतीने साजरी करण्याची परंपरा कायम आहे. युवकांचा उसळता उत्साह, आबालवृद्धांचा आनंद, माता-भगिनींचा मोठा सहभाग आणि आयोजन समितीचे काटेकोर नियोजन यामुळे हा उत्सव पश्चिम विदर्भातील भव्य आणि आदर्श सार्वजनिक उत्सवांपैकी एक म्हणून ओळखला जातो. उत्सव समितीचे प्रमुख शिवराज जाधव यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, “शिवभक्तांचा उत्साह यंदा कितीतरी पटीने वाढलेला दिसून आला. हा उत्सव केवळ आनंदाचा नसून स्वराज्याच्या मूल्यांची आठवण करून देणारा आहे. “जय भवानी, जय शिवराय”च्या जयघोषात दुमदुमलेली मलकापूर नगरी आणि भगव्या लाटेत न्हाऊन निघालेला जनसागर हा शिवजन्मोत्सव प्रत्येकाच्या मनात अभिमानाची ज्योत पेटवून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!