मलकापूर : – शहरात दिवसाढवळ्या चोरीचे प्रकार वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नांदुरा रोडवरील मातोश्री हॉलसमोर उभी असलेल्या दुचाकीची डिक्की फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरुवारी (६ फेब्रुवारी) दुपारी घडली. भररस्त्यावर झालेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हरणखेड (ता. मलकापूर) येथील व्यावसायिक ज्ञानदेव पुंडलिक चिमकर हे बँकेतून रोख रक्कम काढून खामगावकडे निघाले होते. काढलेली रक्कम त्यांनी आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवून लॉक केली होती. दरम्यान, मातोश्री हॉलसमोर काही क्षणांसाठी गाडी थांबवून ते बाजूला गेले असता, याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी डिक्कीचे कुलूप तोडून आत ठेवलेली रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
