Headlines

मलकापूरातील तरुणांच्या कारचा उज्जैन देवदर्शनासाठी जाताना भीषण अपघात; एक ठार तिघे जखमी!

 

मलकापूर :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) मध्यप्रदेशातील उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघालेल्या मलकापूर येथील तरुणांच्या वाहनाचा सणावतजवळ भीषण अपघात झाला. स्विफ्ट डिझायर कार आणि सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात मलकापूर येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवार, २१ जानेवारी रोजी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर शहरातील चार तरुण स्विफ्ट डिझायर कारने उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघाले होते. मध्यप्रदेशातील सणावत परिसरात त्यांच्या वाहनाची समोरून येणाऱ्या सिलेंडर ट्रकशी जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज इतका तीव्र होता की कारचा पुढील भाग अक्षरशः चिरडला गेला. या अपघातात कार चालक पवन रघुनाथ चांभारे (वय २४, रा. हनुमाननगर, मलकापूर) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात कारमधील इतर तिघेजण जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मलकापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, पवन चांभारे यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. मनमिळाऊ स्वभावामुळे पवनचा मोठा मित्रपरिवार होता, त्याच्या जाण्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!