Headlines

वाहतूक पोलीस नसले तरी शिक्षक रस्त्यावर उतरले! महेश भवन मार्गावर नूतन विद्यालयाच्या‘डाबेराव सरांनी दाखवला सामाजिक जबाबदारीचा आदर्श

 

मलकापूर : शासन, पोलीस आणि प्रशासनाची जबाबदारी असलेली कामे कधी कधी सामान्य नागरिकांनाच हाती घ्यावी लागतात, याचे जिवंत उदाहरण मलकापूर शहरातील महेश भवन मार्गावर पाहायला मिळाले. नूतन विद्यालय आणि चांडक विद्यालय या दोन शाळा एकाच मार्गावर असल्याने शाळा सुटण्याच्या वेळी निर्माण होणारी प्रचंड गर्दी, वाहतुकीचा गोंधळ आणि विद्यार्थ्यांचा होणारा त्रास पाहून नूतन विद्यालयातील शिक्षक डाबेराव सर थेट रस्त्यावर उतरले आणि वाहतूक पोलिसांची भूमिका पार पाडत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित मार्ग मोकळा करून दिला. त्यांची ही कृती सध्या शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
महेश भवन मार्गावर नूतन विद्यालय व चांडक विद्यालय या दोन मोठ्या शाळा असून या ठिकाणी दररोज हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात. विशेषतः सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेत दोन्ही शाळांचा वेळ एकच असल्याने या मार्गावर एकाच वेळी मोठी गर्दी उसळते. विद्यार्थ्यांसोबतच गावातील नागरिकही या रस्त्यावरून मोठ्या वाहनांनी ये-जा करत असल्यामुळे काही वेळातच संपूर्ण रस्ता गोंधळात सापडतो. अशा परिस्थितीत लहान-मोठ्या विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. धक्कादायक बाब म्हणजे, एवढ्या संवेदनशील वेळेत आणि ठिकाणी एकही वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित नसतो. परिणामी अपघाताची भीती कायम असून पालकांमध्येही चिंतेचे वातावरण असते. मात्र या गंभीर परिस्थितीकडे केवळ तक्रार म्हणून न पाहता नूतन विद्यालयातील शिक्षक डाबेराव सर यांनी स्वतः पुढाकार घेतला.
शाळा सुटताच त्यांनी कोणत्याही आदेशाची वाट न पाहता रस्त्यावर उभे राहत वाहनांची ये-जा नियंत्रित केली, विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडून दिला आणि काही काळ संपूर्ण मार्ग मोकळा ठेवला. शिक्षक असूनही त्यांनी वाहतूक पोलिसांची भूमिका अत्यंत संयमाने आणि जबाबदारीने पार पाडली. त्यांच्या या कृतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आणि काही काळ तरी गोंधळ टळला. डाबेराव सर यांची ही कृती केवळ कर्तव्यापलीकडची नसून खरी सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी दर्शवणारी आहे. मात्र यामुळे एक गंभीर प्रश्नही उपस्थित होतो जर एखादा शिक्षक विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरू शकतो, तर प्रशासन आणि वाहतूक विभागाने या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना का करू नयेत? महेश भवन मार्गावर शाळा सुटण्याच्या वेळेत नियमित वाहतूक पोलीस नेमणे, वेगमर्यादा फलक लावणे अत्यावश्यक झाले आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाय करण्यापेक्षा आधीच खबरदारी घेणे गरजेचे असल्याची मागणी आता पालक व नागरिकांकडून होत आहे.
डाबेराव सर यांचा हा पुढाकार निश्चितच प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याला सलाम करतानाच संबंधित यंत्रणांनी याची दखल घेऊन तात्काळ ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!