Headlines

माता महाकाली नगरमध्ये नाल्यांची अर्धवट सफाई; प्रभाग १४-१५ च्या वादात नाल्या दुर्लक्षित! नगरपालिका प्रशासन लक्ष देणार का?

 

 

मलकापूर 🙁 उमेश इटणारे ) शहरातील माता महाकाली नगरमध्ये नाल्यांच्या साफसफाईवरून नागरिकांचा संताप व्यक्त झाला आहे. नगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेत प्रभागाच्या हद्दीचा मुद्दा पुढे करत काही नाल्यांची साफसफाई न केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
माता महाकाली नगर हे यावर्षी दोन वेगवेगळ्या प्रभागांत म्हणजेच प्रभाग क्र. १४ व १५ मध्ये विभागले गेले आहे. आज २० जानेवारी रोजी नगरपालिकेचे कर्मचारी परिसरात नाल्यांची साफसफाई करण्यासाठी दाखल झाले. मात्र त्यांनी केवळ प्रभाग क्र. १५ मधील नाल्यांचीच सफाई केली. काही अंतरावर असलेल्या आणि प्रभाग क्र. १४ मध्ये येणाऱ्या नाल्यांची सफाई करण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिला. आम्हाला फक्त प्रभाग १५ मधील नाल्यांचीच सफाई करण्याचे आदेश आहेत. असे कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकारामुळे स्थानिक रहिवासी भूषण बोरसे यांनी नाराजी व्यक्त केली. घरासमोरील नाली साफ करण्याची विनंती फेटाळल्यानंतर अखेर त्यांनी स्वतःच नालीची साफसफाई केली. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना स्वतः पुढाकार घ्यावा लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरात नियमित नाल्यांची सफाई होत नसल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, मलेरिया, टायफॉईडसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले आणि वृद्ध नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असल्याने आर्थिक तसेच मानसिक ताण सहन करावा लागत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
नगरपालिकेने प्रभागाच्या हद्दीपलीकडे जाऊन संपूर्ण परिसराची स्वच्छता करावी, तसेच नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून नियमित नाल्यांची साफसफाई करावी अशी मागणी माता महाकाली नगरमधील रहिवाशांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!