मलकापूर :- शहरात फर्निचर कामाच्या कंत्राटाच्या नावाखाली फसवणुकीचा गंभीर प्रकार समोर आला असून, एका हॉटेल व्यावसायिकाची सुमारे २ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मलकापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यशोधाम परिसरात राहणारे हॉटेल व्यावसायिक मंगलसिंग गोपालसिंग राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुलढाणा रोडवरील ब्राम्हण सभा परिसरातील एका घरासाठी फर्निचरचे काम करण्याचे कंत्राट अकोला येथील मनिषकुमार मांडिवाल व किशोर अंधारे या दोघांना देण्यात आले होते. या कामासाठी टप्प्याटप्प्याने संबंधित ठेकेदारांना सुमारे १३ लाख रुपये देण्यात आले.
मात्र, ७ ऑक्टोबर २०२५ रोजी हे दोघे ठेकेदार मजुरांसह अचानक अर्धवट काम सोडून निघून गेल्याचे लक्षात आले. या वेळी त्यांनी आयका कंपनीचे चार सीलर (अंदाजे ८० हजार रुपये) तसेच किचन रॅकचे ट्रे व इतर फर्निचर साहित्य (सुमारे २ लाख रुपये) असा एकूण २.८० लाख रुपयांचा माल सोबत नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदाराने वारंवार संपर्क साधूनही काम पूर्ण करण्यात आले नाही. उलट मध्यस्थीद्वारे पुन्हा ९५ हजार रुपये घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे. अखेर काम न करता व मौल्यवान साहित्य परत न देता विश्वासघात झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांत धाव घेण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला असून, फर्निचर कंत्राटाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारासह नागरिकांकडून होत आहे.
