मलकापूर :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) तालुक्यात खळबळ उडवणारा प्रकार समोर आला असून, १७ वर्षीय अल्पवयीन युवतीवर शारीरिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात करण दादाराव वानखेडे (वय १९, रा. वरखेड) याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित युवतीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेनंतर पीडित युवतीने हिंमत एकवटत मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, वैद्यकीय अहवालात दुखापतीच्या खुणा तसेच अत्याचारासंदर्भातील महत्त्वाची निरीक्षणे नमूद करण्यात आली आहेत. या अहवालामुळे तपासाला बळ मिळाले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. पीडितेचा जबाब नोंदविण्यात आला असून, घटनास्थळाची पाहणी, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक पुरावे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या घटनेमुळे मलकापूर परिसरात संतापाची भावना व्यक्त होत असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
