Headlines

नव्या तहसीलदारांचा ‘धडाका’; वाळू माफियांवर थेट घाव; कोटेश्वर घाटात मध्यरात्री छापा ८ रेतीने भरलेले टिप्पर जप्त, १.६२ कोटींचा मुद्देमाल, सुमारे २ कोटींचा दंड

मलकापूर ( दिपक इटणारे ):- दबाव असो वा धमक्या, कायद्यापुढे कुणीच मोठं नाही! हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत नव्याने रुजू झालेले तहसीलदार समाधान सोनवणे यांनी मलकापूर तालुक्यात अवैध वाळू माफियांविरोधात इतिहासात नोंद होईल अशी धडाकेबाज कारवाई केली आहे. मध्यरात्रीच्या अंधारात सुरू झालेल्या या ‘ऑपरेशन वाळू’मुळे वर्षानुवर्षे बिनधास्तपणे रेती उपसणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या माफियांना चांगलाच धक्का बसला असून, प्रशासन पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचं स्पष्ट झालं आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १० वाजता महसूल व पोलीस विभागाने संयुक्तरीत्या छापा टाकत रेतीने भरलेले तब्बल ८ टिप्पर ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या टिप्पर व रेतीची अंदाजे किंमत १ कोटी ६२ लाख रुपये असून, या प्रकरणात महसूल कायद्यानुसार सुमारे २ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई जिल्हाधिकारी किरण पाटील आणि उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार समाधान सोनवणे यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गिरी, एमआयडीसी ठाणेदार सपोनि नरेंद्र पेनदोर यांच्या समन्वयाने राबवली. कारवाईदरम्यान नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, मंडळ अधिकारी कुलवंत सिंग राजपूत, व्ही. एन. कोल्हे, तलाठी धीरज जाधव, एसआय टेकाळे, पो.कॉ. राजेश बावणे, पोहेका प्रशांत पाटील, चालक पीसी कळसकर, राहुल खर्चे, महसूल सेवक पंकज जाधव, सचिन चोपडे, तसेच पोलीस आरसीबी पथक सहभागी होते. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या टिप्परमध्ये
आकाश ठाकूर (रा. मलकापूर) एमएच २८ बीबी १२१०, राजू बावस्कर (रा. मलकापूर) – एमएच २८ बीबी ४४१४, वैभव इंगळे (रा. मलकापूर) – एमएच २८ बीबी ७३९७, जिया खान (रा. पानेरा, ता. मलकापूर) – एमएच २८ बीबी ६१७४, निलेश रायपुरे (रा. मलकापूर) – एमएच २८ बीबी २८९५, भैय्या राजपूत (रा. निंबारी) – एमएच २८ बीबी ८९१०, आकाश ठाकूर (रा. सालीपुरा, मलकापूर) – एमएच २८ बीबी ७९३५, पवन रायपुरे (रा. रामवाडी, मलकापूर) – एमएच २८ बीबी ४१७२ या आठ टिप्परचा समावेश आहे. जप्त केलेले सर्व टिप्पर मलकापूर शहर पोलीस स्टेशन व दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले आहेत. महसूल विभागाने कायद्याच्या चौकटीत राहून कठोर पावले उचलत अवैध वाळू वाहतुकीविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्पष्ट केले आहे.
नव्या तहसीलदारांच्या या निर्भीड आणि आक्रमक कारवाईमुळे मलकापूर परिसरातील वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून, “पुढेही बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर अशाच कठोर कारवाया सुरू राहतील” असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!