Headlines

युवा सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ येशी मलकापूर ग्रामीण पंचायत समिती सदस्यपदाच्या रिंगणात

 

मलकापूर : देवदाबा जिल्हा परिषद व मलकापूर ग्रामीण पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असून, त्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध राजकीय पक्षांसह सामाजिक कार्यकर्तेही निवडणूक तयारीला लागले असून, गावोगावी बैठका, चर्चा व संपर्क मोहिमा सुरू झाल्या आहेत. इच्छुक उमेदवार आपापल्या गटांमध्ये मोर्चेबांधणी करत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती-आघाडीपेक्षा स्वबळावर लढण्याचे संकेत मिळत असल्याने स्पर्धा अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. अशा वातावरणात सामाजिक कार्यकर्ते, हनुमान सेनेचे कार्यकारी अध्यक्ष तसेच ‘न्यूज हनुमान सेना’चे मुख्य संपादक नानाभाऊ ओंकारराव येशी यांनी मलकापूर ग्रामीण पंचायत समिती सदस्यपदासाठी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी जाहीर केली आहे. शनिवार, दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता, नानाभाऊ येशी यांनी आपल्या प्रचाराची अधिकृत सुरुवात जांभूळ धाबा (ता. मलकापूर) येथील श्री हनुमान मंदिरातून केली. यावेळी त्यांनी श्री हनुमानाची विधीवत पूजा करून नारळ अर्पण केला. त्यानंतर हनुमान चालीसाचे पठण करत पत्ररूपी मनोगताद्वारे उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.
या वेळी त्यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देत, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त केला. मतदार राजांनी विकासासाठी मतदान करावे, असे आवाहन करत कार्यकर्त्यांना सक्रियपणे कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. प्रचारादरम्यान गावातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा तसेच बेरोजगार युवकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम नसल्याबाबत कोणताही पक्ष ठोस भूमिका घेत नसल्याची नाराजी मतदारांनी उघडपणे व्यक्त केली. यावर नानाभाऊ येशी यांनी लवकरच या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन देत स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला. युवा नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि थेट जनतेशी संवाद यामुळे नानाभाऊ येशी यांच्या उमेदवारीकडे ग्रामीण भागात लक्ष वेधले जात असून, आगामी निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!