Headlines

प्रा. ॲड. कौस्तुभ चंद्रवदन इंगळे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची ‘आचार्य’ (Ph.D.) पदवी जाहीर

 

मलकापूर : – येथील जनता कला व वाणिज्य महाविद्यालयाचे वाणिज्य विभागातील प्रा. ॲड. कौस्तुभ चंद्रवदन इंगळे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्याकडून वाणिज्य शाखेतील ‘आचार्य’ (Ph.D.) ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रा. इंगळे यांनी “पश्चिम विदर्भातील संघटित व असंघटित कामगारांचे ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेतील आर्थिक क्रियांचे अध्ययन : विशेष संदर्भ – बुलढाणा जिल्हा (२००५ ते २०२०)” या विषयावर सखोल संशोधन सादर केले. या संशोधनात ग्रामीण व शहरी भागातील कामगारांच्या आर्थिक स्थितीचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला असून वेतनातील असमानता, रोजगाराची अनिश्चितता, सामाजिक सुरक्षा योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि विकासातील असमतोल यावर महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत.
या संशोधनातून बुलढाणा जिल्ह्यातील रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे मोठ्या प्रमाणावर होत असलेले स्थलांतर, त्याचे सामाजिक परिणाम आणि मागे राहणाऱ्या लोकसंख्येत वृद्धांचे वाढते प्रमाण अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत शासकीय कल्याणकारी योजना पोहोचताना येणाऱ्या अडचणी, भ्रष्टाचार आणि यंत्रणात्मक त्रुटी यामुळे निर्माण होणारी ‘क्षेत्रनिहाय तफावत’ (Sector-wise Gap) या प्रबंधात स्पष्टपणे मांडण्यात आली आहे. हे संशोधन भविष्यात जिल्हास्तरीय रोजगार धोरणे ठरविताना धोरणकर्त्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रा. ॲड. कौस्तुभ इंगळे यांनी हे संशोधन जनता कला व वाणिज्य महाविद्यालयाचे वाणिज्य विभागातील सदस्य व संशोधन मार्गदर्शक डॉ. प्रशांत बी. खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या मौखिक परीक्षेसाठी (Viva Voce) मुंबई येथील के. पी. बी. हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्सचे संशोधन केंद्र प्रमुख डॉ. कुलदीप शर्मा हे बहिस्थ परीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनी प्रबंधाची संशोधनात्मक काठीण्य पातळी व सामाजिक उपयुक्ततेचे विशेष कौतुक केले. त्यानंतर विद्यापीठाने अधिसूचना क्रमांक ७३४/२०२५ अन्वये ही पदवी जाहीर केली. प्रा. इंगळे यांचे एम.कॉम., सेट, एल.एल.बी., जी.डी.सी. अँड ए. झालेले असून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संशोधन पत्रे प्रकाशित केली आहेत. त्यांच्या संशोधन कार्यासाठी लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अरविंद कोलते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर डी. चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. डॉ. पी. एन. लढे, प्रा. डॉ. एस. एल. माळी, प्रा. डॉ. एल. जी. कोलते, प्रा. डॉ. योगेश एन. सरदार, प्रा. डॉ. आर. आर. जोशी, प्रा. डॉ. पूनम काबरा, ग्रंथपाल डॉ. डी. एम. धुमाळे, अधीक्षक शंकर गवळे व लेखापाल अतुल कोलते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रा. ॲड. कौस्तुभ चंद्रवदन इंगळे यांनी आपल्या यशाचे श्रेय संशोधन मार्गदर्शक, महाविद्यालयीन सहकारी तसेच आपले आई-वडील श्रीमती मालती व श्री. चंद्रवदन इंगळे यांना दिले आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!