मलकापूर :- दाताळा येथील डी.ई.एस. हायस्कूलमध्ये झालेल्या मलकापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत नूतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनीने नावीन्यपूर्ण कल्पकतेची छाप पाडत प्रथम क्रमांक पटकावला. ‘प्लास्टिक पायरोलिसिस’ या पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या मॉडेलद्वारे कु. गार्गी सागर शिकेतोड हिने प्रेक्षक आणि परीक्षकांचे लक्ष वेधून घेत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.
तालुक्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयातील नवकल्पना, प्रयोग आणि मॉडेल्स सादर करत विज्ञानाची उंच झेप दाखवली. मात्र, गार्गीने सादर केलेले मॉडेल आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाचा प्रभावी संदेश देणारे ठरल्याने परीक्षकांकडून विशेष दाद मिळाली. या यशाबद्दल लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष डी. एन. पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते, संचालक मंडळ, नूतन इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सुरेश खर्चे, उपप्राचार्य अमोल चोपडे, प्रदीप कोलते, विज्ञान शिक्षक अमोघ घाटे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आनंद व्यक्त करून गार्गीला पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
