डोणगाव (बुलढाणा) – मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विश्वी गावात चोरीच्या संशयावरून एका ३८ वर्षीय युवकास बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा घरी जाऊन मृत्यू झाला. ही घटना ५ डिसेंबर रोजी दुपारी घडली असून, डोणगाव पोलिसांनी या प्रकरणात चौघा आरोपींना तातडीने अटक केली आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पवन गुलाब राठोड (रा. कणका) यांच्या शेतातील लोखंडी अँगल चोरीला गेल्याचा संशय संतोष नामदेव खंडारे (रा. विश्वी) याच्यावर होता. त्यामुळे पवन राठोड यांनी संतोषला कणका शिवारात बोलावून त्याच्यावर चौकशी केली. संतोषने चोरीच्या आरोपांचे खंडन करत इतर संबंधितांची नावे सांगितली. या घटनेनंतर पवन राठोड यांनी नितेश खंडारे, पवन वाघमारे, सतीष त्रिकाळ (तिघे रा. विश्वी) यांना बोलावून घेतले. चौघांनी संतोष खंडारे याला चोरीच्या आरोपांवरून काठी व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीनंतर संतोष जखमी अवस्थेत घरी पोहोचला, घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला व झोपी गेला. मात्र, त्यानंतर तो उठलाच नाही. कुटुंबीयांनी पोलिस पाटलाला कळविल्यानंतर डोणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाणेदार अमर नागरे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक संदीप सावळे यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपींना अर्ध्या तासात अटक करण्यात आली असून, खुनाचा गुन्हा व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई सुरू आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.