मेहकर :- मोठी स्वप्ने पाहणाऱ्या आणि त्यासाठी जिद्दीने परिश्रम करणाऱ्या सारशिव येथील १९ वर्षीय दीपक रामदास जाधव याचा धावण्याच्या सरावादरम्यान अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १२ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे. मुंबई पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दीपक नियमितपणे सारशिव फाटा ते मंगरूळ नवघरे परिसरात धावण्याचा सराव करत होता. नेहमीप्रमाणे तो सराव करत असतानाच त्याला अचानक छातीत वेदना जाणवल्या आणि काही क्षणांत तो कोसळला. उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दीपक हा मेहनती, शांत स्वभावाचा आणि ध्येयवेडा तरुण म्हणून ओळखला जात होता. त्याच्या जिद्दीने आणि शिस्तबद्ध जीवनशैलीने अनेक तरुणांना प्रेरणा दिली होती. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या दीपकच्या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.
त्याच्या स्वप्नांना आणि जिद्दीला सलाम करत ग्रामस्थांनी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
