मेहकर : – बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मेहकर तालुक्यात परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली. तहसीलदार नीलेश मडके यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकाने मंगळवारी तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांवर अचानक धाडी टाकून तपासणी केली. या भरारी पथकाने हिवरा खुर्द येथील जिजामाता हायस्कूल, नायगाव दत्तापूर येथील आप्पा पाटील विद्यालय, जानेफळ येथील सरस्वती विद्यालय तसेच मेहकर शहरातील श्री शिवाजी हायस्कूल या चार परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. तपासणीदरम्यान हिवरा खुर्द येथील जिजामाता हायस्कूलमध्ये एक विद्यार्थी गैरप्रकार करत असल्याचे निदर्शनास आले. तहसीलदार नीलेश मडके यांच्या आदेशानुसार संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे परीक्षा केंद्रांवर शिस्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईत महसूल सहायक प्रवीण परमाळे, अश्विन ठाकरे, महसूल सेवक बंडू गोरे, मंगेश देशमुख तसेच शिपाई दीपक अवचार यांचा भरारी पथकात समावेश होता. दरम्यान, परीक्षेच्या प्रत्येक दिवशी अशाच प्रकारे अचानक तपासण्या करण्यात येणार असून गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार नीलेश मडके यांनी दिला आहे.
