मलकापूर ( दिपक इटणारे ) : शहरात गणेशोत्सवाच्या पर्वात भक्तिभाव आणि सांस्कृतिक वातावरणाची अनोखी साज चढली असून यावर्षी “मलकापूरचा राजा मित्र मंडळ” आपल्या भक्तिभाव, देखावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्याच्या पिढीत तरुणाई अनेकदा व्यसनांच्या विळख्यात सापडताना दिसते; मात्र या मंडळातील तरुणांनी वेगळा आदर्श घालत दररोज भजन, कीर्तन आणि गवळणीच्या माध्यमातून गणरायाची सेवा करून समाजासमोर नवा मार्ग दाखविला आहे.
शहरातील हजारो नागरिक दररोज “मलकापूरचा राजा” चे दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत असून भक्तिमय वातावरणाने परिसर गजबजून जात आहे. विशेष म्हणजे, मंडळाने यावर्षी साकारलेला “केदारनाथ” चा देखावा नागरिकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे. या देखाव्याने केवळ धार्मिक भावनाच जागृत झालेल्या नाहीत, तर हिमालयीन वातावरणाचे अप्रतिम दर्शन घडवत भक्तांच्या श्रद्धेला नवे पंख दिले आहेत. मंडळातील तरुण मंडळींच्या भक्तीभावाने केलेल्या सेवेने एक वेगळाच संदेश मलकापूरकरांना मिळत आहे. व्यसनमुक्तीचा आणि सामूहिक ऐक्याचा संदेश देत त्यांनी समाजातील युवकांसाठी प्रेरणादायी वाट दाखवली आहे. दररोज संध्याकाळी होणाऱ्या भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमामुळे नागरिक मंत्रमुग्ध होतात, तर गवळणीच्या पारंपरिक स्वरूपामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे मन रमते. या मंडळाच्या उपक्रमामुळे मलकापूर शहरात गणेशोत्सव हा फक्त उत्साहाचा नव्हे तर भक्तिभाव, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा सोहळा ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
