जमिनीच्या वादातून वरखेड येथे आई-मुलीवर हल्ला; मुलगा-सुनेविरुद्ध गुन्हा दाखल!

 

मलकापूर : – जमिनीच्या वाटणीवरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाने उग्र रूप धारण करत वरखेड येथे आई व मुलीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी मुलगा व सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वनमाला प्रल्हाद इंगळे (वय ५५), मूळ रा. वरखेड, सध्या सुरत (गुजरात) येथे वास्तव्यास आहेत. जमिनीच्या वाटणीबाबत चर्चा करण्यासाठी त्या गावात आल्या होत्या. गावातील राजू इंगळे यांच्या घरी बैठकीसाठी जात असताना आरोपी कल्पना राजू इंगळे हिने त्यांना अडवून मलकापूरला जाण्याचा आग्रह धरला. मात्र बैठकीसाठी जात असल्याने वनमाला यांनी नकार दिला. यावरून दोघांत वाद निर्माण झाला. दरम्यान, आरोपी राजू प्रल्हाद इंगळे घटनास्थळी येऊन संतापाच्या भरात आईवर हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यात वनमाला इंगळे यांच्या हातांना दुखापत झाली. त्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या त्यांच्या मुलीलाही जखमी करण्यात आल्याचे नमूद आहे. तसेच गोंधळात एका अल्पवयीन मुलीला ढकलण्यात आल्याची तक्रारही करण्यात आली आहे. या प्रकरणी वनमाला इंगळे यांच्या फिर्यादीवरून कल्पना राजू इंगळे व राजू प्रल्हाद इंगळे यांच्याविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार बाळू टाकरखेडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!