लोणार : तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथे झोपेत असताना विषारी सापाने दंश केल्याने १९ वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना ४ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव कुंडपाळ येथील रवींद्र शेषराव सानप यांची १९ वर्षीय मुलगी कु. साक्षी सानप ही शुक्रवारी रात्री आई-वडिलांसोबत घरात झोपलेली होती. यावेळी झोपेत असताना तिला विषारी सापाने दंश केला. सकाळी उठल्यानंतर तिच्या घशात दुखत असल्याची तसेच अॅसिडिटीसारखा त्रास होत असल्याची तक्रार तिने कुटुंबीयांना सांगितली. त्यामुळे कुटुंबीयांनी तात्काळ तिला लोणार येथील दवाखान्यात दाखल केले. लोणार येथे उपचार सुरू असताना प्रकृतीत अपेक्षित सुधारणा दिसून आली नाही. दरम्यान तिच्यात सर्पदंशाची लक्षणे दिसू लागल्याने पुढील उपचारासाठी तिला मेहकर येथे हलविण्यात येत होते. मात्र उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली. दरम्यान, साप शेजाऱ्याच्या अंगणात आढळून आल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
मृत कु. साक्षी सानप ही सुलतानपूर येथील महाविद्यालयात बी. फार्मसी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. तिच्या अकाली निधनाची बातमी समजताच देऊळगाव कुंडपाळ गावात शोककळा पसरली.