Headlines

जमिनीच्या वाटणीवरून ३२ वर्षीय तरुणाचा खून; वडील-भावावर गुन्हा दाखल!

 

लोणार ता. : – तालुक्यातील सावरगाव मुंढे येथे शेतीच्या वाटणीच्या वादातून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वडील आणि भावाविरुद्ध लोणार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी फरार आहेत.
मृतक कृष्णा गणेश चव्हाण (वय ३२, रा. सावरगाव मुंढे) यांच्यात कुटुंबासोबत काही दिवसांपासून शेतीच्या हिस्स्यावरून वाद सुरू असल्याची माहिती आहे. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास घरातच वाद चिघळल्याने त्यांच्यावर गंभीर हल्ला करण्यात आला. डोक्यावर झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.
मृतकाची पत्नी रेणुका चव्हाण (वय ३०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कुटुंबात वारस व जमिनीच्या वाटणीच्या मुद्द्यावरून तणाव होता. याच कारणावरून वडील गणेश रूपचंद चव्हाण आणि भाऊ सोनू गणेश चव्हाण यांनी संगनमताने हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीवरून लोणार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!