गोठ्यावर टिन पत्रे दुरुस्त करत असताना विद्युत वाहिनीचा शॉक लागून २७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

दुसरबीड (सिं.राजा) : तालुक्यातील खैरखेड येथे घरासमोरील गुरांच्या गोठ्यावर टिन पत्रे दुरुस्त करत असताना विद्युत वाहिनीचा शॉक लागून २७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ४ मार्च रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून संबंधित विभागाच्या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खैरखेड येथील अरविंद गंगाधर वाघ (वय २७) हा आपल्या घरासमोरील गुरांच्या गोठ्यावर टिन पत्रे दुरुस्त करण्याचे काम करत होता. त्यावेळी घराच्या अगदी जवळून गेलेल्या विद्युत वाहिनीमुळे टिन पत्र्याचा झोक थेट विद्युत तारेवर गेला. त्यामुळे अरविंद वाघ यांना जोरदार विजेचा शॉक बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, ही विद्युत वाहिनी घराच्या अत्यंत जवळून गेल्यामुळे धोका असल्याची तक्रार अरविंद वाघ यांनी यापूर्वीही पारेषण केंद्र सोनूशी येथील कनिष्ठ अभियंता (जेई) तसेच संबंधित विद्युत कर्मचाऱ्यांकडे अनेक वेळा तोंडी केली होती. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे खैरखेड गावात हळहळ व्यक्त होत असून विद्युत विभागाच्या निष्काळजीपणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!