गजानन टॉकीज रोडवरील खड्डा म्हणजे मृत्यूचा सापळा; प्रशासन मोठ्या अपघाताचीच वाट पाहतेय का?

मलकापूर ( दिपक इटणारे ): शहरात विकासाच्या गप्पा, रस्ते सुरक्षेच्या घोषणा मोठ्या आवाजात दिल्या जात असताना, प्रत्यक्षात मात्र मलकापूर शहरातील गजानन टॉकीज रोडवर रस्त्याच्या मध्यभागी पडलेला एक मोठा खड्डा नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर हा खड्डा म्हणजे जणू मृत्यूचा सापळाच बनला असून, या ठिकाणी केव्हाही मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे या खड्ड्यात दररोज दुचाकी, रिक्षा तसेच चारचाकी वाहने अडकत असून, अनेक वेळा वाहनचालक थोडक्यात बचावले आहेत. अचानक ब्रेक, घसरलेली वाहने, संतुलन बिघडून पडलेले नागरिक असे प्रकार सातत्याने घडत असतानाही संबंधित प्रशासनाकडून मात्र आश्चर्यकारक शांतता बाळगण्यात येत आहे. गजानन टॉकीज रोड हा शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा रस्ता असून, व्यापारी, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. मात्र रस्त्याच्या मध्यभागी असलेला हा खोल आणि रुंद खड्डा पाहता वाहनचालक अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहन चालवत आहेत. रात्रीच्या वेळी या खड्ड्याचा अंदाज येणे कठीण होत असून, अपघाताचा धोका अधिकच वाढतो. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने केवळ दुर्लक्षच केले नाही, तर खड्ड्याजवळ कोणतीही सूचना फलक, बॅरिकेड्स किंवा तात्पुरती उपाययोजना देखील करण्यात आलेली नाही. परिणामी वाहतूक कोंडी होत असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांचे नुकसान तर होत आहेच, पण जीवितहानी होण्याचा धोका अधिक गंभीर बनला आहे. अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? एखादा निष्पाप नागरिक जखमी किंवा मृत झाल्यानंतरच डोळे उघडणार का?
असे सवाल आता संतप्त नागरिक विचारत असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाने तात्काळ या खड्ड्यावर धापा टाकून रस्ता दुरुस्ती करावी व सुरक्षित वाहतुकीची हमी द्यावी. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनावरच राहील का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!